बातम्या
भागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
By nisha patil - 9/9/2025 11:39:57 PM
Share This News:
भागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
सध्या संस्थेचे ३ हजार २०० सभासद असून, २ कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. अहवाल सालात ६४ लाखांचे कर्जवाटप झाले असून, खेळते भागभांडवल ₹४१.२५ लाख इतके आहे. संस्थेला नुकताच समाधानकारक ढोबळ नफा झाल्याचे लेखापरिक्षक शिवराज मगर यांनी स्पष्ट केले.
सभा अध्यक्ष सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भागीरथी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत महिलांसोबत घट्ट नातं निर्माण केले असून, महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी विविध योजना राबवल्या जातील.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी संस्थेच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पारदर्शी कारभारावर भर देत, महिला बचत गटांना कर्जपुरवठा व स्वमालकीची इमारत आणि लॉकर सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त केली.
सभेत संगीता खाडे, अनुराधा सामंत यांच्यासह महिलांनी विधायक सूचना केल्या. संचालक मंडळाचा सभासदांकडून सत्कारही करण्यात आला. या प्रसंगी तज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक यांच्यासह महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
|