शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात
By nisha patil - 8/1/2026 10:52:40 AM
Share This News:
कोल्हापूर:- शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव (२०२५–२०२६) अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण मोठ्या उत्साहात पार पडले. राजर्षी शाहू सभागृहामध्ये मुकनाट्य, नकला, लघुनाटिका तसेच ‘शाहिरी बाणा’ या लोककलेच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
शाहीर पृथ्वीराज माळी व परिवार यांच्या ‘शाहिरी बाणा’ या कार्यक्रमात पारंपरिक वाद्यवृंदाच्या साथीने पोवाडा, भारूड आणि शिवगीते यांचे बहारदार व प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा ठसा ठळकपणे उमटला.
या कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह डॉ. रघुनाथ धमकेल, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. विनोद ठाकुरदेसाई, डॉ. प्रल्हाद माने, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, श्रीमती सुरेखा अडके तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात
|