विशेष बातम्या

शासनाविरोधात हजारो शिक्षकांचे "मूक" आक्रंदन शैक्षणिक व्यासपीठाने दाखवली शिक्षकांची वज्रमूठ

The silent outcry of thousands


By nisha patil - 8/11/2025 5:20:41 PM
Share This News:



शासनाविरोधात  हजारो शिक्षकांचे "मूक" आक्रंदन शैक्षणिक व्यासपीठाने दाखवली शिक्षकांची  वज्रमूठ

कोल्हापूर  :  अन्यायकारक टिईटी परीक्षा विरोधात आज ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हजारो शिक्षक रस्त्यावरती एकत्र आले आणि त्यांनी मुकमोर्चाद्वारे शासनाचे विविध प्रश्नांवरती लक्ष वेधले . एक सप्टेंबर रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षक पात्रता परीक्षेबाबत निर्णयाविरुद्ध राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक असताना याबाबत शासनाची आडमुठी भूमिका लक्षात घेवून आज प्रथम मूक आंदोलन आणि त्यानंतर २४ नोव्हेंबररोजी राज्यव्यापी आंदोलन करून लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले .

१३ डिसेंबर २०१३ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना या निर्णयाची अंमलबजावणी न करता सरसकट सर्वांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने त्याचे शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असून लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते भरत रसाळ यांनी व्यक्त केले . शिक्षक भारतीचे दादा लाड तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी कौस्तुभ गावडे, अभयकुमार साळुंखे, राजाराम वरुटे, राजेंद्र कोरे आदी शिक्षक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले .

टीईटीपरीक्षेचा अन्याय कारक निर्णया खेरीज १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा, शिक्षणसेवकपद रद्द व्हावे, वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू तारखेपासून गृहीत धरावी, सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी आदीप्रमुख मागण्या मोर्चामध्ये लक्ष वेधून घेत होत्या . मोर्चा मध्ये शिक्षक आमदार आणि इच्छुक शिक्षक आमदार उमेदवार एकाच व्यासपीठावर आल्याने गर्दीमध्ये तो चर्चेचा विषय ठरला होता . शिक्षकांच्या हाती असणारे विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले . जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रमुख नेत्यांनी मनोगत सादर केले . पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटून निवेदन दिले .
     

यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे एस . डी लाड, बाबा पाटील, प्रसाद पाटील, खंडेराव जगदाळे, श्रीराम साळुंखे, भैय्या माने,विजयसिंह माने, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सविता पाटील, विजय भोगम,  संतोष आयरे, सरीता शिंदे, पार्वती नंदुरे, प्रसाद रेळेकर, नागेश हंकारे, आदी मान्यवर उपस्थित होते.


शासनाविरोधात हजारो शिक्षकांचे "मूक" आक्रंदन शैक्षणिक व्यासपीठाने दाखवली शिक्षकांची वज्रमूठ
Total Views: 34