ग्रामीण

आजरा ऑटो रिक्षा व्यवसायिकांची परिस्थिती बिकट -रिक्षा स्टॅंडची सोय करणे गरजेचे

The situation of Ajra auto rickshaw traders is dire


By nisha patil - 10/30/2025 12:20:04 PM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- आजरा हे तालुक्याचे ठिकाण असलेने रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची रेलचेल सुरु असते. कोल्हापूर, पुणे, मुंबई, सावंतवाडी, वेंगुर्ला आदि ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना आजऱ्यात घरी पोहचण्यासाठी रिक्षाचाच आधार घ्यावा लागतो. त्यासाठी एस. टी. स्टॅंडजवळच कित्येक वर्षे रिक्षास्टॅंड आहे. परंतु महामार्ग झाल्यापासून या रिक्षा स्टँडला जागाच उपलब्ध करून दिली जात नसल्याने रस्त्याच्या कडेला स्टॅंडच्या उत्तरबाजूला हे रिक्षा स्टॅंड सद्या आहे. परंतु महामार्गावर वाहतुकीची अडचण व जागेची अडचण लक्षात घेऊन एस. टी. स्टॅंडच्या एका बाजूला रिक्षास्टॅंडची तजविज करावी अशी मागणी मागील काही महिन्यापासून सुरु आहे. तरीसुद्धा या मागणीकडे गांभीर्याने घेतले जात नाही.
     अलीकडच्या काही वर्षात ऑटो रिक्षा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी रिक्षा खरेदी करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. अनेकांनी बँकाकडून व खाजगी वित्त संस्थाकडून दोन ते तीन लाखांचे कर्ज घेऊन रिक्षा व्यवसाय सुरु केले आहेत.

व्यावसायात स्पर्धा वाढल्यामुळे दररोजचे उत्पन्नही घटले आहे. घरोघरी वाढलेल्या चार चाकी वाहने, टू व्हिलरचे वाढते प्रमाण यामुळेसुद्धा रिक्षा व्यवसायाला फटका बसला आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलचे वाढलेले दर, सरकारने अवाजवी आणि निरर्थक लादलेले कर, पासिंगच्या न परवडणाऱ्या अटी, प्रवाशांची घटलेली संख्या यामुळे रिक्षा व्यवसाय परवडत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना  बँकेच्या कर्जाचे हफ्ते वेळेत भरणे कठीण झाले आहे. परिणामी रिक्षा चालकांचा व व्यावसायिकांचा मानसिक ताण वाढतच चालला आहे.

आजऱ्यामध्ये प्रशासन जागा उपलब्ध करून देणेस टाळाटाळ करीत असलेने रिक्षा लावणेस जागाही अपुरी पडत आहे. एस. टी. स्टॅंडच्या पश्चिमेला किंवा उत्तरेला जागा उपलब्ध असतानाही रिक्षा स्टॉपसाठी जागा दिली जात नाही.

हेतूपूरस्कर हा प्रश्न गंभीर केला जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे लोकप्रतिनिधिंनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होताना दिसत आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय "या ब्रीदवाक्याला साजेशे रिक्षा चालकांना जगण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. महागाईच्या आगीत अगोदरच संसार होरपळून निघत आहे. त्यात या अडचणीना सामोरे जाताना त्यांची दमछाक होत आहे.


आजरा ऑटो रिक्षा व्यवसायिकांची परिस्थिती बिकट -रिक्षा स्टॅंडची सोय करणे गरजेचे *
Total Views: 298