विशेष बातम्या
आजऱ्यातील दवर्डे गावच्या सुपुत्राचे पारंपारिक वाद्याच्या गजरात जल्लोशी स्वागत
By nisha patil - 1/23/2026 4:31:29 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार) :- आजरा तालुक्यातील देवर्डे सारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील गरीब शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम करीत आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर सर केले आहे. प्रतीक संदीप इक्के या युवकाने आपल्या हिंमतीवर सीमा सुरक्षा दलामध्ये भरती होऊन आपली जिद्द पूर्ण करीत आपले ध्येय साध्य केले आहे. बी.एस.एफ.चे ट्रेनिंग पूर्ण करून नुकताच आपल्या देवर्डे गावी परतला. देवर्डे गावच्या या सुपुत्राचे पारंपरिक वाद्याच्या गजरात, लेझीम पथकाच्या ठेक्याने जल्लोशी स्वागत करण्यात आले. तसेच गाडीतून प्रतिकची गावात मिरवणूक काढण्यात आली.
प्रतिकचे वडील संजय इक्के हे साधे,सामान्य शेतकरी. शेती करीत आजऱ्याच्या एका हॉटेलमध्ये काम करतात. आई गृहिणी, शेतीत हातभार लावते आणि दोघे संसाराचा गाडा हाकत इथं पर्यंत आले. प्रतिकचा लहान भाऊ बी.एस.सी. शिक्षण पूर्ण करून तोही भरतीच्या तयारीला लागला आहे. प्रतिकने बी.एस.सी. शिक्षण पूर्ण करून दोन वेळा राज्य पोलीस दलामध्ये प्रयत्न केले. परंतु नोकरी करीत भावाचे शिक्षण आणि आपले ध्येय साध्य करताना यश दरात येऊन हुलकावणी देत होते. तरीही त्याने हार मानली नाही. भावाच्या शिक्षणासाठी आणि घरासाठी गोव्यामध्ये नोकरी करीत तयारी सुरु होती. परंतु नोकरी आणि तयारी जमत नसल्याने नोकरी सोडून पुन्हा गावी आला. पूर्णवेळ देऊन सीमा सुरक्षा दलासाठी तयारी केली आणि पहिल्या प्रयत्नताच यश संपादन केले. सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर देवर्डे ग्रामस्थ आणि नवयुवक मित्रमंडळ, देवर्डे यांच्यावतीने पारंपरिक वाद्याच्या गजरात गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देवाचे दर्शन घेऊन आईच्या हस्ते औक्षण केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई, शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गावच्या सरपंच कल्पना चाळके, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती कांबळे, दत्तात्रय चाळके, विशाल आढाव, इंद्रजित देसाई, युवा नेते अनिकेत चराटी, आजरा साखर कारखान्याचे माजी सुरक्षा अधिकारी भरत तानवडे,दशरथ मळेकर तसेच नवयुवक मित्रमंडळाचे कार्यकर्ते व देवर्डे ग्रामस्थ उपस्थित होते.
आजऱ्यातील दवर्डे गावच्या सुपुत्राचे पारंपारिक वाद्याच्या गजरात जल्लोशी स्वागत
|