बातम्या
नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार!
By nisha patil - 10/29/2025 4:50:53 PM
Share This News:
नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार!
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी “आधी मतदारयाद्या दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या” अशी मागणी केली असली, तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे समजते.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आयोगाकडून हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गट-गण रचना व आरक्षण जाहीर झाले असून, नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीही प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महापालिकांसाठी आरक्षण जाहीर होणे बाकी आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जातील. शेवटी महापालिका निवडणुका पार पडतील, अशी चर्चा आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांमधील त्रुटींवर आक्षेप घेतला असला, तरी आयोग निवडणुका पुढे ढकलण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर विरोधक कोणती भूमिका घेतात, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार!
|