ताज्या बातम्या
करवीरमधील सर्व उमेदवारांचा विजय हीच कै. पी. एन. पाटील यांना खरी श्रद्धांजली : हसन मुश्रीफ
By nisha patil - 1/25/2026 2:57:07 PM
Share This News:
करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या विजयाच्या माध्यमातून कै. पी. एन. पाटील आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेला आदर व्यक्त करावा, तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय भरून काढावा, असेही त्यांनी सांगितले.
स्वयंभूवाडी (ता. करवीर) येथील श्री. स्वयंभू मंदिर परिसरात करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, स्वर्गीय कै. पी. एन. पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र आले आहेत. हा पक्ष कार्यकर्त्यांसाठी परका नसून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास व्यक्त करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या मतदारसंघातील सर्व बारा वाड्यांचे प्रश्न सोडवले जातील. विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. निवडणुकीत माघार घ्यावी लागलेल्या कार्यकर्त्यांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय दिला जाईल. तसेच लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील–सडोलीकर यांनी सांगितले की, या परिसरातील वाड्या-वस्त्यांपासून गावागावांपर्यंत झालेल्या विकासकामांमध्ये कै. पी. एन. पाटील यांचे योगदान मोठे आहे. जनतेने त्यांना नेहमीच ताकद दिली असून, त्यांच्या पश्चातही हीच जनता आपल्यासह सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. रेखाताई प्रकाश मुगडे, सांगरूळ पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. मेघा आनंदराव नाळे तसेच बहिरेश्वर पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. लता सूर्यकांत दिंडे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली.
कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह शंकरराव पाटील, महेश पाटील, संतोष पोरलेकर, शिवाजीराव देसाई, भाजपच्या सरचिटणीस सौ. सुशीलाताई पाटील, कृष्णात चाबूक, सचिन पाटील, शामराव सूर्यवंशी, सुभाष सातपुते, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश मोरे, विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
करवीरमधील सर्व उमेदवारांचा विजय हीच कै. पी. एन. पाटील यांना खरी श्रद्धांजली : हसन मुश्रीफ
|