ताज्या बातम्या

आगीत संसार जळाला, पण आईच्या आठवणीतील साडीने वाचवली मेहनतीची पुंजी

The world burned down in a fire  but the saree in memory of the mother saved the capital of hard work


By nisha patil - 7/1/2026 11:36:01 AM
Share This News:



कोल्हापूर, ता. ६

दिवसभर कचरा विघटनाच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून संसार चालवणाऱ्या सय्यद कुटुंबावर आज सकाळी मोठे संकट ओढावले. शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागून घरातील सर्व साहित्य, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जळून खाक झाली. मात्र, दिवंगत आईच्या आठवणी म्हणून जपून ठेवलेल्या साडीत गुंडाळलेली दीड लाख रुपयांची रक्कम आगीतून सुखरूप बचावली.

रशीद सय्यद आणि रेश्मा सय्यद हे पती-पत्नी झूम प्रकल्पात कचरा विघटनाचे काम करतात. महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांच्या पगारातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांच्या भविष्यासाठी थोडीथोडी बचत करत होते. हीच आयुष्यभराची जमापुंजी आगीत भस्मसात झाली.

रशीद सय्यद यांच्या आईचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिच्या स्मृती म्हणून ठेवलेली साडी आणि त्यात गुंडाळून ठेवलेली आईच्या नावावरील दीड लाख रुपयांची रक्कम कपाटातील पेटीत होती. सुदैवाने ती पेटी आगीपासून वाचली.

“आईचा हात अजूनही माझ्या डोक्यावर आहे,” असे म्हणत रशीद सय्यद भावुक झाले.

घटनेच्या वेळी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर होते. आग इतकी भीषण होती की कपाटातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही वितळून गेले. घराची अवस्था पाहून पती-पत्नी दोघेही कोलमडून पडले.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार या आगीत १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

“कष्ट करून जमवलेला सगळा संसार एका क्षणात गेला,” अशी व्यथा रेश्मा सय्यद यांनी अश्रूंनी व्यक्त केली. मुलांचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून केलेली बचत राखेत मिसळली, ही वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


आगीत संसार जळाला, पण आईच्या आठवणीतील साडीने वाचवली मेहनतीची पुंजी
Total Views: 138