बातम्या
खोचीतील तरुणांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक
By nisha patil - 9/15/2025 5:04:09 PM
Share This News:
खोचीतील तरुणांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक
खोची | प्रतिनिधी- किशोर जासूद हातकणंगले तालुक्यातील खोची गावातील तरुणांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि जबाबदारी सध्या गावभर चर्चेत आहे. गणेशोत्सवानिमित्त गावातील विविध मंडळे व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन वारणा नदीच्या पात्रात करण्यात आले होते. मात्र, विसर्जनावेळी नदीच्या पात्राबाहेर पाणी साचल्याने मोठ्या मूर्ती व निर्माल्य पूर्णपणे विसर्जित होऊ शकले नव्हते. परिणामी नदीकाठी अस्वच्छता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मूर्ती व निर्माल्याचे पुनर्विसर्जन नदीच्या पात्रात केले. कोणताही बडेजाव किंवा गाजावाजा न करता, निसर्ग व धार्मिक परंपरेप्रती आदर दाखवत त्यांनी हा उपक्रम राबविला. यामुळे नदी प्रदूषित होण्याचा धोका टळला तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईलाही आळा बसला.
समाजाप्रती असलेली ही जाणीव आणि स्वच्छतेसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न पाहून गावातील नागरिक, समाजसेवक तसेच परिसरातील विविध स्तरातून या तरुणांचे कौतुक होत आहे.
या उपक्रमावेळी समितीचे सर्व पदाधिकारी महादेव पाटील, अनिकेत पाटील, शुभम पवार, निखिल बामणे, राज पाटील, शंभू अपराध, ओमकार गुरव, अभिमन्यू जगदाळे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.
गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तरुणांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
👉 “धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम खोचीतील तरुणांनी राबवला असून यामुळे तरुण पिढीचे आदर्श उदाहरण समोर आले आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
खोचीतील तरुणांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक
|