बातम्या

महापालिकेच्या २०२६-२७ अंदाजपत्रकात व्यावसायिक दरवाढ होणार नाही – देशमुख व ऋतुराज क्षीरसागर

There will be no commercial rate hike in the Municipal Corporation


By Administrator - 3/14/2026 1:22:06 PM
Share This News:



महापालिकेच्या २०२६-२७ अंदाजपत्रकात व्यावसायिक दरवाढ होणार नाही – देशमुख व ऋतुराज क्षीरसागर

कोल्हापूर, दि. १३ : कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक लवकरच सादर होणार असून या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची व्यावसायिक दरवाढ होणार नाही, अशी ग्वाही शिवसेना महानगरपालिका गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाला दिली.

कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन विविध व्यावसायिक प्रश्नांबाबत निवेदन दिले. या बैठकीची व्यवस्था नगरसेवक शारंगधर देशमुख व ऋतुराज क्षीरसागर यांनी केली होती.

चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी यांनी महापालिकेच्या गाळेधारकांच्या भाडेप्रश्नांबाबत भूमिका मांडताना सांगितले की, २०१५ पासून गाळेधारकांच्या भाड्याबाबत वाद सुरू आहे. २०१९ नंतरचे भाडे निश्चित करण्यात आले असले तरी अनेक गाळेधारक कोरोनाच्या संकटातून सावरत असल्यामुळे भाडे भरू शकले नाहीत. त्यामुळे थकीत भाडे, दंड, व्याज आणि जीएसटीसह नोटिसा दिल्या जात असून गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.

गाळेधारक भाडे भरण्यास तयार असून नोटिसांमध्ये भाडे, दंड व व्याज यांचे स्वतंत्र ब्रेकअप देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावर नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कायद्याने दोन वेळा अभय योजना देता येते का याची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

अमर क्षीरसागर यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीतील थकीत गाळेधारकांना जीएसटीच्या नोटिसा देण्यात आल्याबाबत आक्षेप घेत त्या दुरुस्त करण्याची मागणी केली. तर खुले व विस्थापित गाळेधारक रेडीरेकनरच्या दोन टक्के भाडेवाढीने भाडे भरण्यास तयार असल्याचे किशोर काटवे यांनी सांगितले.

याशिवाय व्यवसाय परवाना, अग्निशमन कर, घरफाळा व परवाना नूतनीकरणाची मुदत वाढविणे यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. व्यापार-उद्योग सध्या अडचणीत असल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक दरवाढ करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्रातील इतर शहरांतील धोरणांचा अभ्यास करून निर्णय घेऊ असे सांगितले.

बैठकीला महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगलताई साळोखे, नगरसेवक अजय इंगवले, आस्कीन आजरेकर, रत्नेश शिरोळकर, स्वरूप कदम तसेच चेंबरचे संचालक संपत पाटील, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, संदीप वीर आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सील गाळ्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार – ऋतुराज क्षीरसागर

सील केलेले गाळे पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर व शारंगधर देशमुख यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली. आमदार राजेश क्षीरसागर याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडणार असून तोपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी ऋतुराज क्षीरसागर यांनी केली.


महापालिकेच्या २०२६-२७ अंदाजपत्रकात व्यावसायिक दरवाढ होणार नाही – देशमुख व ऋतुराज क्षीरसागर
Total Views: 10