बातम्या
आजीच्या गळ्यातील सोन्याचे फुलांचे गंठण चोरट्यांनी लांबविले; आळवे येथे घरफोडी
By nisha patil - 9/17/2026 9:56:54 PM
Share This News:
आजीच्या गळ्यातील सोन्याचे फुलांचे गंठण चोरट्यांनी लांबविले; आळवे येथे घरफोडी
७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस; दुसऱ्या घरातही चोरीचा प्रयत्न
पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर,आळवे (ता. पन्हाळा) येथे घराचा कडी-कोयंडा तोडून अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश करत ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळवे येथील प्रल्हाद संभाजी लाड यांच्या घरी त्यांच्या ८० वर्षीय आई हिराबाई बापू लाड झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी काढून घरात शिरत हिराबाई लाड यांच्या गळ्यातील सोन्याचे ७ ग्रॅम वजनाचे फुलांचे गंठण जबरदस्तीने काढून घेतले. या दागिन्याची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरट्याने त्यानंतर साक्षीदार सौरभ पाटील यांच्या घरीही अनधिकृतपणे प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३०९(५), ३०९(६), ३३१(२), ३३१(४), ३३१(६) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून पन्हाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सरगर असून, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
आजीच्या गळ्यातील सोन्याचे फुलांचे गंठण चोरट्यांनी लांबविले; आळवे येथे घरफोडी
|