बातम्या

“हद्दवाढ रोखणार्‍यांना शहराबाहेर हाकलू!” — कृती समितीचा सरकारला इशारा

Those who block the extension will be thrown out of the city


By nisha patil - 11/12/2025 3:04:31 PM
Share This News:



“हद्दवाढ रोखणार्‍यांना शहराबाहेर हाकलू!” — कृती समितीचा सरकारला इशारा


हद्दवाढीचा शब्द देऊनही शहरवासीयांची दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता ४२ गावांना प्राधिकरणाचा विशेष दर्जा देत हद्दवाढीला जाणीवपूर्वक खो घातल्याचा आरोप करून कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. आयआरबीसारख्या कंपन्यांना हाकलून लावणाऱ्या कोल्हापूरकरांचे सामर्थ्य लक्षात ठेवावं, अन्यथा हद्दवाढीच्या आड येणाऱ्यांना कायमचे शहराबाहेर हाकलू, असा कडक इशारा समितीने बुधवारी बैठकीत दिला.

ही बैठक समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी झाली. अध्यक्षस्थान ॲड. बाबा इंदूलकर यांनी भूषवले. पोवार म्हणाले की, “पालकमंत्र्यांनी प्राधिकरणाचे गाजर दाखवून हद्दवाढीच्या मूळ विषयाला बगल दिली. लोकांना दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आता लढा अधिक जोमाने उभारणार आहोत.”

ॲड. बाबा इंदूलकर यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटलं की,
“महापालिका निवडणुकीची अधिसूचना अजूनही निघालेली नाही. त्यामुळे हद्दवाढ होण्याची संधी अजूनही आहे. पण पालकमंत्रीच या प्रक्रियेत अडथळा आणत आहेत. शहराचा श्वास गुदमरतोय आणि लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत. हद्दवाढीचा निर्णय होईपर्यंत आम्ही थांबणार नाही.”

दिलीप पोवार म्हणाले, “हा लढा सामूहिक आहे. प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा घेऊन जनजागृती करू. हद्दवाढीचा विषय घराघरांत पोहोचवू.”
यावेळी बाबा पार्टे, अनिल घाटगे, अशोक भंडारी, किशोर घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर एक गंभीर आरोप करताना ॲड. इंदूलकर म्हणाले की,
“हद्दवाढीबाबत चर्चा करण्यासाठी १० वेळा वेळ मागूनही पालकमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. शहरातील शिंदेसेनेचे आमदार हद्दवाढीबाबत आग्रही आहेत. पुढील अडीच वर्षांत त्यांच्याकडे पालकमंत्रिपद जाऊ शकते. त्यामुळे त्यांना श्रेय जाऊ नये म्हणूनच आजचे पालकमंत्री हद्दवाढीत अडथळा आणत असल्याचा संशय गडद होतो.”

कोल्हापूरच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असून, कृती समितीचा सूर आता अधिक आक्रमक झाला आहे.


“हद्दवाढ रोखणार्‍यांना शहराबाहेर हाकलू!” — कृती समितीचा सरकारला इशारा
Total Views: 14