बातम्या
मोफत वीज योजनेच्या पुनर्सर्वेक्षणातून कोल्हापूर परिमंडलातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार लाभ
By nisha patil - 4/10/2025 9:23:30 AM
Share This News:
मोफत वीज योजनेच्या पुनर्सर्वेक्षणातून कोल्हापूर परिमंडलातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार लाभ
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर, दि. ०३ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र राज्यातील कृषिपंप ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणली आहे. ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी भार असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र वीज बिलात चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. आता या सर्व बिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठीच्या सूचना महावितरणच्या सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली आहे. यामुळे योजनेच्या पुनर्सर्वेक्षणातून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शासनाकडून कृषी ग्राहकांना वीज सवलत देत "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना" राबवित आहे याबाबतचा शासन निर्णय दि. 25.07.2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ही योजना ५ वर्षांसाठी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यातील ७.५ अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
मात्र कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील काही कृषी ग्राहकांकडून प्रत्यक्षात जागेवर कृषीपंप क्षमता ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी वापर असलेल्या परंतु वीज देयकावर ७.५, ८, ८.५ ते ९.०० अश्वशक्ती असा भार उल्लेख असलेबाबत व त्यामुळे "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा" लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक कार्यालयांना संबंधित कृषीपंपांची स्थळ तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून प्राप्त प्राथमिक अहवाल योग्य त्या माहितीसाठी मुख्य कार्यालयास सादर करणेत आला होता.
महावितरणच्या परिमंडल कार्यालयास, प्रकाशगड या मुख्य कार्यालयाकडून सदर प्राथमिक अहवालसोबतच कृषीपंपांची प्रत्यक्ष क्षमतेची खातरजमा करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. सद्यस्थितीत संबंधित कृषीपंपांच्या आवश्यक तांत्रिक बाबींची स्थळ पडताळणी व कृषीपंपांचे करंट व एकूण प्रत्यक्ष भार याची प्रत्यक्ष तपासणी सर्व स्थानिक कार्यालयांकडून चालू करणेत आली आहे. पडताळणी अहवालानुसार कृषीपंप भारांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणेत येत आहेत. ज्यांचे कृषीपंप प्रत्यक्षात ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे आढळतील त्यांचे वीजभारात आवश्यक दुरुस्ती करून त्यांना "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा" लाभ देणेत येईल, अशी माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
मोफत वीज योजनेच्या पुनर्सर्वेक्षणातून कोल्हापूर परिमंडलातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार लाभ
|