बातम्या
इचलकरंजीतील तरुणाचे अपहरण करून निपाणीमध्ये निर्घृण खून — तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
By nisha patil - 8/12/2025 11:00:56 AM
Share This News:
कोल्हापूर : इचलकरंजीतील १९ वर्षीय सुहास सतीश थोरत या तरुणाचे अपहरण करून त्याचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निपाणी परिसरातील कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहासला मोटारसायकल दुरुस्त करुन देऊ असे सांगून संशयित ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार आणि एका अल्पवयीन मुलाने त्याला घरातून बोलावून नेले. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार व मारहाण करण्यात आली. दरम्यान, सुहास घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवली.
पोलिसांनी शोधमोहीम राबवित असताना दुसऱ्या दिवशी सकाळी देवचंद कॉलेजच्या मागील कालव्यात एक मृतदेह आढळला. तपासात तो मृतदेह सुहासचा असल्याची खात्री झाली. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असून त्याचा क्रूरपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि तिघा संशयितांना ताब्यात घेतले. अपहरणापासून खूनापर्यंतची संपूर्ण घटनाक्रम, गुन्ह्याचे कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे इचलकरंजी आणि निपाणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इचलकरंजीतील तरुणाचे अपहरण करून निपाणीमध्ये निर्घृण खून — तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
|