बातम्या
गोकुळच्या मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त! २०० मीटर परिसरात निर्बंध लागू!
By nisha patil - 9/10/2026 7:32:10 PM
Share This News:
गोकुळच्या मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त! २०० मीटर परिसरात निर्बंध लागू!
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आता प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. १८ ऑक्टोबरला मतदान, तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून, या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणी केंद्र परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात निर्बंध लागू राहणार आहेत.मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बूथ उभारणे, प्रचार साहित्य वापरणे आणि अनधिकृत वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तर १०० मीटर परिसरात मोबाईल, वायरलेस उपकरणे आणि शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर, छायाचित्रण, चित्रीकरण आणि मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या कृतींनाही मनाई करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर जमाव, प्रचार आणि सार्वजनिक सभा घेण्यावरही निर्बंध असणार आहेत. दुसरीकडे, १९ ऑक्टोबर रोजी रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश, वाहनांचा वापर, मोबाईल वापर आणि शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत मतदानापासून मतमोजणीपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.
गोकुळच्या मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त! २०० मीटर परिसरात निर्बंध लागू!
|