बातम्या

तिलारी महिला खून प्रकरणाची उकल; कोल्हापूर पोलिसांना 'बेस्ट डिटेक्शन' राज्य पुरस्कार!

Tilari woman murder case solved


By nisha patil - 11/13/2026 7:44:11 PM
Share This News:



तिलारी महिला खून प्रकरणाची उकल; कोल्हापूर पोलिसांना 'बेस्ट डिटेक्शन' राज्य पुरस्कार!

 कोल्हापूर पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. चंदगड तालुक्यातील तिलारी घाट परिसरात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या निर्घृण खून प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांना महाराष्ट्र राज्याचा 'सर्वोत्कृष्ट गुन्ह्याची उकल' अर्थात 'बेस्ट डिटेक्शन' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

२९ मे २०२६ रोजी कोदाळी ते दोडामार्ग रस्त्यावरील तिलारी प्रेशर पॉईंट परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेच्या डोक्यावर शॉक अ‍ॅब्झॉर्बरच्या पाईपने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. त्यानंतर चंदगड पोलिसांत खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील मिसिंग महिलांची माहिती तपासली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि वाहनांच्या हालचालींचा माग काढत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

चंदगड ते बेळगाव क्रुझर गाडीचा, तर बेळगाव ते हुबळी तब्बल ११० किलोमीटरपर्यंत पल्सर मोटारसायकलचा माग काढत पोलिसांनी या गुन्ह्यातील चारही संशयित आरोपींना अटक केली. भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांचा रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


तिलारी महिला खून प्रकरणाची उकल; कोल्हापूर पोलिसांना 'बेस्ट डिटेक्शन' राज्य पुरस्कार!
Total Views: 20