बातम्या

"वाढदिवसाच्याच दिवशी काळाने हिरावला जीव:

Time took my life away on my birthday


By nisha patil - 11/18/2025 3:32:01 PM
Share This News:



"वाढदिवसाच्याच दिवशी काळाने हिरावला जीव: 

रेंदाळ–शिरोळमध्ये दोन ऊस वाहतूक अपघात; वृद्ध व महिलेचा मृत्यू"

कोल्हापूर जिल्ह्यात रेंदाळ आणि शिरोळ येथे झालेल्या दोन स्वतंत्र ऊस वाहतूक ट्रॅक्टर–ट्रॉली अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रेंदाळमधील अपघातात एका वृद्धाचा, तर शिरोळ येथील घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हुपरी–इचलकरंजी मार्गावरील रेंदाळ येथे झालेल्या अपघातात दादासाहेब बाळासाहेब पाटील (वय ६१, रा. रांगोळी) यांचा जागीच मृत्यू झाला. ऊस भरून येणाऱ्या ट्रॅक्टर–ट्रॉलीची त्यांच्या दुचाकीला भीमनगरजवळ धडक बसली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले आणि ट्रॉलीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा तत्काळ मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन्ही ट्रॉली क्रमांकाविना असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्याकडे आहे.

दादासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने सकाळीच गावकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. मोबाईल स्टेटस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच सायंकाळी त्यांच्या श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकण्याची वेळ नातेवाईक आणि मित्रपरिवारावर आली.

रांगोळी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक संस्थांशी निगडित असलेल्या पाटील यांनी वाढदिवसानिमित्त गावात स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी २१ हजार देणगी तसेच पुस्तकांसाठी ११ हजार रुपये देण्याची घोषणाही केली होती; मात्र नियतीने त्यांचा संकल्प अधुराच ठेवला.

शिरोळ मध्येही असाच अपघात घडून एका महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात ऊस वाहतूक ट्रॅक्टर–ट्रॉलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


"वाढदिवसाच्याच दिवशी काळाने हिरावला जीव:
Total Views: 32