शैक्षणिक
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे किमान पाच मूलभूत कौशल्ये आवश्यक – डॉ. ए. एम. गुरव
By nisha patil - 6/2/2026 3:32:40 PM
Share This News:
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे किमान पाच मूलभूत कौशल्ये आवश्यक – डॉ. ए. एम. गुरव
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, आय.क्यू.ए.सी. व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉमर्स फेस्टिवल 2026 अंतर्गत “जीवन कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर कार्यशाळा अत्यंत आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून आत्मविश्वास, सहनशीलता व जीवन कौशल्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणून डॉ. ए. एम. गुरव (माजी वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे विचार मांडले. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे किमान पाच मूलभूत कौशल्ये असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांच्या आधारे जीवन कौशल्यांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत त्यांनी सविस्तर व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेस आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एम. ए. शिंदे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. उज्वला पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. अथर्व कोल्हापुरे यांनी केले.या प्रसंगी कॉमर्स विभागासह महाविद्यालयातील इतर विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चीफ व्हॉइस पेट्रन तथा चेअरमन मा. श्री. मानसिंग बोंद्रे (दादा) यांचे मौल्यवान प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे किमान पाच मूलभूत कौशल्ये आवश्यक – डॉ. ए. एम. गुरव
|