बातम्या

अहंकार सोडून नम्रतेने जगणे हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग!

To live with humility  having let go of one s ego


By nisha patil - 10/16/2026 3:16:58 PM
Share This News:



अहंकार सोडून नम्रतेने जगणे हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग!
 

ह.भ.प. पांडुरंग गांजवे यांचे दुर्गापूजा व नवरात्रोत्सवानिमित्त निरूपण
 

पन्हाळा प्रतिनिधी शहानवाज मुजावर कोतोली श्री स्वामी विवेकानंद महिला मंडळ, कोतोली यांच्या वतीने दुर्गापूजा व  नवरात्रोत्सवानिमित्त बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ह.भ.प. श्री. पांडुरंग गांजवे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील ‘राजविद्या राजगुह्य योग’ यामधील ‘थोरपण पऱ्हां सांडिजे’ या ओवीवर मार्मिक निरूपण केले.
 

नवरात्रोत्सव हा आत्मशुद्धी, भक्ती आणि शक्तीच्या जागरणाचा पवित्र उत्सव आहे. या काळात प्रत्येकाने ईश्वराचे अनुसंधान ठेवून अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमधील आत्मशक्ती जागृत करताना अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ह.भ.प. गांजवे यांनी केले.
         

माणसाने आपल्या पदाचा, संपत्तीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा गर्व न बाळगता नम्रतेने जीवन जगावे, हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा मुख्य संदेश आहे. खरे मोठेपण इतरांवर प्रभाव गाजवण्यात नसून त्यांना सन्मान देण्यात आहे. ‘व्युत्पत्ति आघवी विसरिजे’ या विचारातून विद्वत्तेचा अहंकार सोडण्याची, तर ‘जैं जगा धाकुटें होईजे, तैं जवळिक माझी’ या ओवीतून विनम्रतेने वागण्याची शिकवण मिळते. नम्रता, प्रेम, सेवा आणि सद्भावना यांमुळे माणसे एकमेकांशी जोडली जातात; मात्र अहंकार माणसाला इतरांपासून दूर नेतो. त्यामुळे संतांचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
         

या प्रवचनाला गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात झालेल्या या निरूपणातून उपस्थितांना संतविचारांची प्रेरणा मिळाली.


अहंकार सोडून नम्रतेने जगणे हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग!
Total Views: 11