बातम्या
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड
By nisha patil - 10/13/2026 7:47:58 PM
Share This News:
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड
कोल्हापूर दि:13अल- निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.त्यामुळे जिल्ह्यात विविध प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिली.
खरीप हंगाम 2026–दुष्काळ व पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, रोहयो उपजिल्हाधिकारी शक्ती कदम,कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे,जिल्हा प्रशासनाधिकारी(न .पा) अजय पाटणकर, मनपा उपायुक्त नागेंद्र मुतकेकर हे प्रत्यक्ष तर मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील व जलसंपदाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे ऑनलाईन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जलसंपदा विभागाने उपलब्ध असलेल्या पाण्याचा मृत साठा (डेड स्टॉक) सोडून दहा टक्के पाण्याचा बफर स्टॉक करावा. पाणी वापराबद्दल जनतेत व्यापक जनजागृती करावी. त्याचबरोबर धरण क्षेत्र ठिकाणी असलेल्या पाणी गळती दुरुस्तीला अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात पाण्याच्या नळांना तोट्या बसविण्यात आले आहेत का ? याची संबंधित यंत्रणेने खातरजमा करावी. जिल्हा परिषदेने साधारणता 2 हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे कोणतेही कनेक्शन कट करण्यात येऊ नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात पशुधन जगावे यासाठी जानेवारी ते जुलै 2027 या कालावधीत विपुल प्रमाणात चारा निर्मिती करण्याचे प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हयात प्रथम कळ (ट्रीगर-1) मध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यांमध्ये सुमारे 80 टक्के इतके पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे हे दोन दिवसात करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एसटीपी पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार असल्याची माहिती अनुक्रमे आयुक्त डॉ भारुड व पल्लवी पाटील यांनी दिली तर जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका क्षेत्रात येत्या 16 ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात करण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात येणार असल्याचे अजय पाटणकर यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये असलेल्या उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
या आढावा बैठकीसाठी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर,ग्रामीण पाणीपुरवठा (जि.प) कार्यकारी अभियंता व्ही ए कराड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रमोद बाबर,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय.ए नाईक,वरिष्ठ भूवैज्ञानिक(भूजल)शशिकांत निंबाळकर,जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते .
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड
|