बातम्या

आजरा-आंबोली मार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक हैराण!

Traffic jam on Ajra Amboli road


By nisha patil - 11/17/2026 3:37:30 PM
Share This News:



आजरा-आंबोली मार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक हैराण!

प्रतिनिधी हसन तकीलदार आजरा शहरातील आजरा-आंबोली मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक आणि नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत छत्रपती संभाजी चौक ते आजरा पोलीस स्टेशन, तसेच हॉटेल मॉर्निंग स्टार ते तहसील कार्यालय या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुड्डेखान यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांना निवेदन दिले आहे.

आजरा-आंबोली मार्गावरील ट्रॅव्हल्स कार्यालयांसमोर मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसेस तासनतास रस्त्यावर उभ्या करून प्रवासी घेतले जातात. तसेच संभाजी चौक परिसरात येणारे पर्यटकही वाहने मिळेल त्या ठिकाणी पार्किंग करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याशिवाय सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर यांचीही वर्दळ वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी संभाजी चौकात झालेल्या अपघातात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

त्यामुळे लक्झरी बसेससाठी शहराबाहेर पार्किंगची व्यवस्था करावी, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत पोलिसांची विशेष वाहतूक व्यवस्था तैनात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी नौशाद बुड्डेखान, नदीम तकीलदार, शाहिद नाईकवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 


आजरा-आंबोली मार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक हैराण!
Total Views: 94