बातम्या
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स व अॅप्सपासून सावध राहण्याचे आवाहन
By nisha patil - 12/23/2025 10:47:03 AM
Share This News:
कोल्हापूर :- अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलन सेवांच्या नावाखाली बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs) तसेच SMS व WhatsApp द्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंक्सद्वारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माध्यमातून वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळखीचा गैरवापर केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केले आहे.
परिवहन विभागाची अधिकृत संकेतस्थळे
वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे gov.in या डोमेनने समाप्त होतात. com, online, site, in अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइट्सवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
ई-चलन प्रलंबित असल्याचे सांगून तातडीने दंड भरण्याची धमकी देणारे संदेश, “DL सस्पेंड होणार आहे” असे भ्रामक मेसेज पाठवून अनधिकृत लिंक्सवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. मात्र, RTO किंवा परिवहन विभाग कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक्स पाठवत नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसेच RTO Services.apk, mParivahan_Update.apk, eChallan_Pay.apk यांसारखी अनधिकृत अॅप्स डाउनलोड करू नयेत. अशा अॅप्सद्वारे OTP, बँकिंग माहिती व मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.
कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ National Cyber Crime Portal – https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाईन 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स व अॅप्सपासून सावध राहण्याचे आवाहन
|