बातम्या
खड्ड्यांतून प्रवास… आणि टोल वसुलीवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
By nisha patil - 8/21/2025 5:30:41 PM
Share This News:
खड्ड्यांतून प्रवास… आणि टोल वसुलीवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
खड्डेमय रस्ते, अखंड वाहतूक कोंडी आणि जीवघेणे अपघात… हे आपल्या देशातील कोट्यवधी वाहनधारकांचं रोजचं वास्तव आहे. नागरिकांकडून टोलच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जातात, मात्र त्याच्या बदल्यात मिळतात ते खड्डे, धोकादायक प्रवास आणि वेळेचं नुकसान. याच अन्यायाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ताजा निर्णय ऐतिहासिक ठरत आहे.
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पलियाक्कारा टोल नाक्यावर सुरू असलेली वसुली अन्यायकारक असल्याचं स्पष्ट करून, त्या वसुलीवर बंदी कायम ठेवली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं – ६५ किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ ५ किलोमीटरचा टप्पा खराब असला, तरी त्याचा त्रास, विलंब आणि धोका संपूर्ण प्रवासात सोसावा लागतो. अशा परिस्थितीत वाहनचालकांकडून टोल वसुली करणं म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेची थट्टा आहे.
हा निर्णय केवळ केरळपुरता मर्यादित नाही. तो आता देशभरातील टोल नाक्यांवरील वसुलीसाठी एक मार्गदर्शक तत्त्व ठरू शकतो. कर आकारून सुविधा न देणे हे अन्यायकारक आहे, हा संदेश सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिला आहे.
आजवर नागरिकांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित झाला, मात्र न्यायव्यवस्थेने तो ऐकला आणि न्याय दिला. या निर्णयामुळे प्रशासन आणि रस्ता बांधणी करणाऱ्या कंपन्यांवर जबाबदारी निश्चित होणार आहे.
"टोलपेक्षा नागरिकांचं कल्याण महत्त्वाचं" – सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाने सामान्य माणसाच्या सहनशीलतेला मिळालेला हा मोठा दिलासा आहे.
हा निर्णय म्हणजे – रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधातील लढाईला न्यायालयीन शिक्कामोर्तब!
देशभरातून या निर्णयाचं स्वागत होत आहे.
खड्ड्यांतून प्रवास… आणि टोल वसुलीवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
|