विशेष बातम्या
राष्ट्रीय खेळाडू ओजस कळंत्रेच्या स्मृतीस मानवंदना;
By nisha patil - 3/6/2025 6:26:29 PM
Share This News:
राष्ट्रीय खेळाडू ओजस कळंत्रेच्या स्मृतीस मानवंदना;
व्हनाळीत अनोख्या पद्धतीने वृक्षारोपणाचा संकल्प
व्हनाळी (ता. कागल) : गावासाठी राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवणाऱ्या बॉक्सिंगपटू ओजस उर्फ तन्मय सचिन कळंत्रे याच्या स्मृतीस अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य मयत झाल्यास त्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करून, रक्षा नदी वा ओढ्यामध्ये न टाकता लावलेल्या झाडांना अर्पण करण्याचा संकल्प घेतला आहे.
ओजस कळंत्रे याचे दि. ३१ मे २०२५ रोजी पुण्यात दुचाकीवरून पडून अपघाती निधन झाले. बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर तीन वेळा सुवर्णपदक आणि राज्यस्तरावर सहा सुवर्णपदकांची कमाई करत त्याने व्हनाळी गावाचे नाव उज्वल केले होते. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वडील, चुलते, मामा आणि संपूर्ण कळंत्रे कुटुंबियांनी त्याच्या वयाइतकी म्हणजेच २० झाडे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात आणि स्मशानभूमीत लावली. विशेष म्हणजे ओजसची रक्षा देखील या झाडांच्या मुळाशी टाकण्यात आली.
या वृक्षारोपण उपक्रमात राजेंद्र कळंत्रे, उपसरपंच ओंकार कौदाडे, प्रशिक्षक प्रशांत मोटे, वृक्षमित्र सुभाष पाटील, संदीप कौंदाडे, प्रभाकर पाटील, राजेंद्र जांभळे, अक्षय चौगुले, नेताजी कळंत्रे, दत्ता दंडवते, कुंभार सर,प्रकाश कुळवमोडे, महेश कौंदाडे, आकाश रांगोळे, संजय वाडकर, प्रदीप जाधव, सुनील जाधव, रवींद्र जाधव, जगदीश वाडकर, डॉ. उत्तम जाधव, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हा संकल्प केवळ ओजसच्या स्मृतीपुरता मर्यादित न राहता, गावातील प्रत्येक व्यक्तीच्या निधनानंतर एक सामाजिक संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा बनणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राष्ट्रीय खेळाडू ओजस कळंत्रेच्या स्मृतीस मानवंदना;
|