बातम्या
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
By nisha patil - 11/28/2025 4:22:18 PM
Share This News:
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणांची आजही गरज :डॉ शोभा चाळके- म्हमाने
कोल्हापूर : महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन, शेतकऱ्यांसाठी,श्रमिकांसाठी लढा दिला. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांचे पोवाडे गायले. त्यांचे विचार समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय हक्कासाठी ते सतत लढत राहिले .आजही त्यांच्या सामाजिक सुधारणांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन शहाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्राध्यापिका डॉ. शोभा चाळके- म्हमाने यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्या प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जीवन व कार्य असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. शोभा चाळके म्हमाने म्हणाल्या, दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी सामाजिक अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर प्रखरपणे हल्ला चढवला. स्वतः ते कृतिशील समाज सुधारक होते. सामाजिक, शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा सुचवल्या आणि त्याप्रमाणे ते वागले. 1852 साली त्यांनी 18 शाळा आणि एक प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केला. मुलींसाठी पहिली शाळा भारतात त्यांनी सुरू केली. ते युग प्रवर्तक आणि कृती कृतिशील समाजसुधारक होते.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, आजच्या काळातही महात्मा फुलेंचे कार्य आणि विचार सर्वांना लागू पडतात. आज महिलांचे, मुलींचे प्रश्न, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवताना महात्मा फुले यांचे कार्य आठवते. त्यांच्या विचाराने हे प्रश्न सुटू शकतात. शाहू फुले आंबेडकर यांनी भारतीय समाज व्यवस्था जिवंत केली. ती टिकून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यातही शिक्षकाची
जबाबदारी अधिक आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालले पाहिजे. त्यांचे विचार आपल्या जीवनाचा भाग बनले पाहिजेत .
स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी कोडक यांनी केले. डॉ. शिवाजी रायजादे यांनी आभार मानले. आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे,प्रा.शरयू शेवडे, डॉ.डी.के.वळवी, प्राध्यापक प्रशासकीय सहकारी ,विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले .शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथांचे यावेळी ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले.
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
|