बातम्या
आजरा आगाराच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शिवसेना (उबाठा)चा तिरडी मोर्चा
By nisha patil - 9/21/2025 9:44:34 PM
Share This News:
आजरा आगाराच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शिवसेना (उबाठा)चा तिरडी मोर्चा
विद्यार्थ्यांना जीवघेणी पायपीट; प्रवाशांचे वाढते हाल
आजरा (हसन तकीलदार) (प्रतिनिधी) : आजरा एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांसोबतच विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे. बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने डोंगरी व जंगली भागातील विद्यार्थ्यांना सायंकाळी गावाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागते. तर वृद्ध, महिला प्रवाशांना जंगलातून जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. या समस्येकडे आगार प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) तर्फे शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वा. आजरा आगारावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाबाबत निवेदन आजरा पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष युवराज पोवार, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आणि युवासेना उपतालुका प्रमुख अमित गुरव उपस्थित होते.
आजरा तालुका डोंगराळ व ग्रामीण भाग असल्याने, तसेच शहरात मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल व शासकीय कार्यालये असल्यामुळे नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी एस. टी. हेच प्रवासाचे मुख्य साधन आहे. मात्र, आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे वेळेत बसेस मिळत नाहीत, वस्तीगाड्या बंद केल्या आहेत, तर काही फेऱ्या वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरा गावात पोहचावे लागते.
“केवळ रनिंगच्या नादात अर्निंगकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे,” असे शिवसेना (उबाठा)च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आजरा आगाराच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शिवसेना (उबाठा)चा तिरडी मोर्चा
|