बातम्या

कोल्हापूर परिमंडल राज्यात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करा

Try to bring Kolhapur constituency to the top in the state


By Administrator - 7/3/2026 10:59:03 AM
Share This News:



कोल्हापूर परिमंडल राज्यात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करा

महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांचे आवाहन

कोल्हापूर व सांगली जिल्हात 51 कोटी 54 लाखांची थकबाकी

कोल्हापूर :- कोल्हापूर परिमंडल ग्राहकसेवा, प्रकल्प, यंत्रणा सक्षमीकरण अशा विविध मापदंडात अव्वल आहे. येथील वीज ग्राहक प्रामाणिक असून येथे नियमीत वीज देयक भरण्याची परंपरा आहे. सध्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 3 लाख 18 हजार ग्राहकांकडे 51 कोटी 54 लाखाची थकबाकी आहे. मार्च अखेर कोल्हापूर परिमंडलातील सर्व शाखा व उपविभाग कार्यालये यांची थकबाकी शुन्य केल्यास सर्वच मापदंडात कोल्हापूर परिमंडल राज्यात अव्वल राहील. त्या करीता सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चालू देयकासह थकबाकी शुन्य करावी, त्याकरिता विशेष पथके तयार करा, असे आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी केले.

    महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), अमित बोकील (सांगली), पुनम रोकडे (पायाभूत आराखडा) सहाय्यक महाव्यवस्थापक विजय गुळदगड (विवले), शशिकांत पाटील (मासं) उपस्थित होते.

 यावेळी कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर म्हणाले, ‘घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर वर्गवारीतील कोल्हापूर जिल्ह्यातील 01 लाख 62 हजार 801 ग्राहकांकडे 26 कोटी 45 लाख तर सांगली जिल्ह्यातील 01 लाख 55 हजार 250 ग्राहकांकडे 25 कोटी 01 लाख इतक्या रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांचा पुरवठा तात्काळ खंडित करा व त्यांनी पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज जोडणी करा. यंत्रमाग व इतर औद्योगिक ग्राहकांशी वीज बील थकबाकी वसुली करीता व्यक्तिशः संपर्क साधा. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवा. महावितरणने पुर्ण केलेल्या विविध प्रकल्पांचे भाग- भांडवलात रुपांतर करण्याची प्रक्रिया मार्च अखेर पुर्ण करा, असे आदेश कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिले.

बैठकीपूर्वी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सुरु असणाऱ्या विविध कामाचे संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. 

 


कोल्हापूर परिमंडल राज्यात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करा
Total Views: 37