MPSC च्या सचिवपदी तुकाराम मुंढे! विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या

Tukaram Mundhe appointed as MPSC Secretary


By nisha patil - 12/10/2026 3:06:35 PM
Share This News:



MPSC च्या सचिवपदी तुकाराम मुंढे! विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे आणि धडाकेबाज निर्णयांमुळे राज्यभरात ओळख निर्माण केलेले तुकाराम मुंढे आता MPSC च्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून MPSC च्या कारभारावरून तसेच विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात होते. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, परीक्षांचे वेळापत्रक, निकालातील सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्याच्या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे आयोगाच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानता येईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात भरती प्रक्रियेत कोणते बदल होणार, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर काय निर्णय घेतले जाणार आणि आयोगाचा कारभार कितपत सुधारेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर MPSC च्या कामकाजात सकारात्मक बदल घडणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.


MPSC च्या सचिवपदी तुकाराम मुंढे! विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या
Total Views: 17