बातम्या

शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत

Twenty five percent concession in crop loan interest for institutions


By Administrator - 3/24/2026 6:29:36 PM
Share This News:



शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत
      
केडीसीसी बँकेचा विकास सेवा संस्थांना दिलासा
       
स्वर्गीय आमदार पी. एन.  पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी
           
१७० विकास सेवा संस्थांना मिळणार सव्वा कोटी व्याज परतावा

       
कोल्हापूर, दि. २४: जून -२०२५ अखेर पीक कर्जासह मध्यम मुदत व इतर सर्वच कर्जबाकीची शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सेवा संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत देण्याचा निर्णय केडीसीसी बँकेने घेतलाआहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील १७०  विकास सेवा संस्थांना सव्वा कोटी रुपये व्याज सवलतीची रक्कम परत मिळणार आहे. या माध्यमातून विकास सेवा संस्थांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. बँकेने स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत हे धोरण निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ताळेबंदातील तरतुदीमधून ही रक्कम विकास सेवा संस्थांना वर्ग केली आहे.

          
याबाबत अधिक माहिती अशी, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या  केडीसीसी बँकेच्या ८७  व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष व  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास सेवा संस्थांना व्याजात भरघोस सवलत देण्याची घोषणा केली होती. केडीसीसी बँक बँकेच्या स्तरावर पीक कर्जासाठी विकास सेवा संस्थांना चार टक्के व्याजाची आकारणी करते. त्यापैकी एक टक्का म्हणजेच आकारलेल्या व्याज रकमेच्या पंचवीस टक्के व्याज परतावा रक्कम विकास सेवा संस्थांना दिला जाणार आहे. बँकेचा थकबाकीवरील खर्च कमी करण्यासह विकास सेवा संस्थांना शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी प्रोत्साहन देणे, कर्जाच्या परतफेडीमध्ये शिस्त लावणे, उर्वरित विकास सेवा संस्थांनी कर्ज वसुलीचे अनुकरण करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.
            
या प्रोत्साहनपर व्याज सवलतीच्या मिळालेल्या रकमेतून विकास सेवा संस्थांना आर्थिक सक्षमता प्राप्त होणार आहे. त्या माध्यमातून संस्थांच्या स्वनिधीसह सभासद शेतकऱ्यांना लाभांश वाटप, प्रोत्साहनपर रक्कम देऊ शकतात. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीला या योजनेमुळे बळकटी येणार आहे
               
चालू वसुली वर्षासाठी दोन कोटींची तरतूद......!
याबाबत बोलताना बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विकास सेवा संस्थांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सबंध महाराष्ट्रात "स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान" ही  अभिनव अशी योजना केडीसीसी बँकेने राबविली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून चालू वसुली वर्षासाठीही दोन कोटींची तरतूद केली जाणार आहे. दि. ३० जून २०२६ या वसुली वर्षाअखेर जास्तीत जास्त विकास सेवा संस्थांनी आपापल्या स्तरावर शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक विकास सेवा संस्थांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होईल.


शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांना पीक कर्ज व्याजात पंचवीस टक्के सवलत
Total Views: 12