ताज्या बातम्या
अंबप येथे विषबाधेने वीस मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे चार लाखांचे नुकसान – ४० मेंढ्यांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यश
By nisha patil - 7/11/2025 1:41:56 PM
Share This News:
अंबप (ता. हातकणंगले): अंबप येथे मेंढ्यांना झालेल्या विषबाधेमुळे तब्बल २० मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सर्जेराव हिरवे (अंबप) यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसांपासून अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रियल पार्क परिसरात चरत होत्या. बुधवारी दिवसभर चरतल्यानंतर मेंढ्या सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यात आल्या. मात्र गुरुवारी सकाळी मेंढ्यांचे पोट फुगू लागल्याने सतीश हिरवे यांनी स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले.
उपचार सुरू असतानाच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत परिस्थिती गंभीर झाल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले, परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या मृत अवस्थेत होत्या. तात्काळ दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार करून सुमारे ४० मेंढ्यांना वाचवले.
घटनास्थळी सरपंच दीप्ती माने, उपसरपंच असिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे, अजित माने, तलाठी उमेश माळी यांनी भेट देऊन माहिती घेतली व मेंढपाळ सतीश हिरवे यांची विचारपूस केली.
सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण नाईक, डॉ. यशोदीप कांबळे, डॉ. आरती दांडगे, डॉ. रजनीकांत अवताडे, डॉ. स्वरूप चाळके, डॉ. आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांचे पोस्टमार्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले. घटनास्थळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
🔶 चौकट बातमी:
सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानंतर काहीजणांनी मृत मेंढ्या मटन विक्रीसाठी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली.
अंबप येथे विषबाधेने वीस मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे चार लाखांचे नुकसान – ४० मेंढ्यांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे यश
|