बातम्या
मोक्काच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी पुण्यात जेरबंद! राजारामपुरी पोलिसांची कारवाई
By nisha patil - 4/11/2026 3:09:36 PM
Share This News:
मोक्काच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी पुण्यात जेरबंद! राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापुरातील मोक्का गुन्ह्यातील दोन फरार संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथून राजारामपुरी पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून पाळत ठेवली होती. कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात १५ ऑगस्ट २०२६ रोजी रवी गोविंद कांबळे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
प्राथमिक तपासात टोळीच्या वर्चस्ववादातून आणि आर्थिक लाभाच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली होती.
या गंभीर गुन्ह्यातील त्र्यंबक वसंत गवळी (वय ३९) आणि अमित हणमंत गवळी (वय १९) हे दोघेही फरार होते. दरम्यान, हे संशयित आरोपी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील जांभुळवाडी तलाव परिसरात असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने वेषांतर करून परिसरात पाळत ठेवली आणि सापळा रचत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.
मोक्काच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी पुण्यात जेरबंद! राजारामपुरी पोलिसांची कारवाई
|