बातम्या
सुभाषनगरात पिस्तूल-काडतूसासह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
By nisha patil - 11/18/2025 4:27:36 PM
Share This News:
सुभाषनगरात पिस्तूल-काडतूसासह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
जुना राजवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुभाषनगर परिसरात विदेशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. विशाल बबन जाधव उर्फ मांगुरे (३१, सुभाषनगर) आणि सौरभ शिवाजी पाटील (२१, साई मंदिरजवळ, सुभाषनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
मंगळवार पेठेतील यल्लाम्मा चौकात एक गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक महेश पाटील यांना मिळताच पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता सापळा रचला. एका हॉस्पिटलच्या पाठीमागील रिकाम्या जागेत संशयित दिसताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
विशालच्या अंगझडतीत त्याच्या कंबरेला विदेशी बनावटीची काळ्या रंगाची पिस्तूल मिळाली, तर सौरभच्या खिशातून एक जिवंत काडतूस आढळले. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ५०,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमर पाटील यांनी फिर्याद दिली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिली.
पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाले आणि श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर पाटील, प्रवीण सावंत, सागर डोंगरे, प्रशांत घोलप, वैभव खोत, प्रशांत पांडव, नीलेश नाझरे, मोहन लगारे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
सुभाषनगरात पिस्तूल-काडतूसासह दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
|