विशेष बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 : महाराष्ट्राला १ लाख कोटींचा निधी; मेट्रो, हायस्पीड रेल्वे आणि शेतीवर भर

Union Budget 2026 27 Maharashtra receives 1 lakh crore in funds focus on metro highspeed rail and agriculture


By nisha patil - 2/2/2026 1:41:51 PM
Share This News:



केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 : महाराष्ट्राला १ लाख कोटींचा निधी; मेट्रो, हायस्पीड रेल्वे आणि शेतीवर भर

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महाराष्ट्राला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, विविध योजनांमधून राज्याला तब्बल ₹1 लाख कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय करवाटपातून ₹98,306 कोटी, तर विविध विकास प्रकल्पांसाठी ₹12,355 कोटी मिळणार आहेत.

या अर्थसंकल्पात राज्यातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, मुंबई मेट्रोसाठी ₹31,702 कोटी, पुणे मेट्रोसाठी ₹3,517.74 कोटी आणि मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी ₹6,103 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पासाठी ₹462 कोटी, तर समृद्धी महामार्गावर आधुनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ₹680.79 कोटी देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी ₹378.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रालाही अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी ₹3,207.10 कोटी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ₹464.24 कोटी, तसेच अॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी ₹167.28 कोटी मंजूर झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा खर्चात बचत होऊन उत्पादनक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने इकॉनॉमिक क्लस्टर विकासासाठी ₹283.77 कोटी, कौशल्य विकास व अप्लाईड नॉलेज प्रकल्पासाठी ₹313.65 कोटी, तर जिल्ह्यांमधील संस्थात्मक क्षमतावृद्धीसाठी ₹240.90 कोटी देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रमासाठी ₹385.78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद यांसह देशभरात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, याचा थेट फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमुळे राज्याच्या आर्थिक गतीला चालना मिळून जीडीपी वाढीस बळकटी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 : महाराष्ट्राला १ लाख कोटींचा निधी; मेट्रो, हायस्पीड रेल्वे आणि शेतीवर भर
Total Views: 14