ताज्या बातम्या
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ग्रामीण डाक सेवक संमेलनास संबोधित करणार
By nisha patil - 12/13/2025 11:01:47 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे 13 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित ग्रामीण डाक सेवक (GDS) संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारताच्या दुरवरच्या भागात टपाल, बँकिंग व विमा सेवांचा विस्तार करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेणे हा आहे.
मंत्री श्री. सिंधिया यांच्यासोबत जितेंद्र गुप्ता, महासंचालक (डाक सेवा) व अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल तसेच सुवेंदू कुमार स्वैन, सदस्य (कार्मिक), पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड; श्री अभिजीत बनसोडे, संचालक, पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन आणि रमेश पाटील, संचालक, पोस्टल सर्व्हिसेस, गोवा रिजन हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
कार्यक्रमास गोवा आणि पुणे क्षेत्रातील अंदाजे 5500 ते 6000 ग्रामीण डाक सेवक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमादरम्यान मंत्री श्री. सिंधिया ग्रामीण डाक सेवकांशी संवाद साधून ग्रामीण टपाल सेवेचे आधुनिकीकरण व नागरिक-केंद्रित टपाल नेटवर्क उभारण्याबाबत आपला दृष्टिकोन मांडणार आहेत आणि ग्रामीण भागात सरकारी व आर्थिक सेवा पोहोचविण्यात ग्रामीण डाक सेवकांची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी त्यांना प्रेरित करणार आहेत.
यावेळी नवीन खाती उघडणे, टपाल जीवन विमा (PLI) व ग्रामीण टपाल जीवन विमा RPLI योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ देणे, प्रिमियम संकलन, थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्यवहार, तसेच नोंदणीकृत टपालाचे वेळेवर वितरण अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे संमेलन ग्रामीण भारतातील लोकाभिमुख सेवा वितरणासाठी भारतीय टपाल विभागाला अधिक सक्षम करण्याची सरकारची दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. देशातील प्रत्येक टपाल कार्यालय नागरिकाभिमुख सेवांचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ग्रामीण डाक सेवक संमेलनास संबोधित करणार
|