शैक्षणिक
माजी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत विद्यापीठ व शासन सकारात्मक; आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
By nisha patil - 4/8/2025 4:25:14 PM
Share This News:
माजी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत विद्यापीठ व शासन सकारात्मक; आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
कोल्हापूर (दि. ४ ऑगस्ट) – शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागातील माजी सैनिकांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक, रजा रोखीकरण आदी मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत विद्यापीठ प्रशासन व राज्य शासन दोन्हीही संवेदनशील आणि सकारात्मक आहेत. येत्या २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले असून, आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजीराव परुळेकर (समाजवादी पार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जुलैपासून सुरू असून, सुरुवातीपासूनच विद्यापीठ प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधत त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. १८, २१, २७, ३० जुलै आणि १ ऑगस्ट रोजी आंदोलकांसोबत विविध स्तरांवर चर्चा करून प्रशासनाने शासनाकडील सकारात्मक कार्यवाहीची माहितीही दिली.
प्रशासनाने सुरक्षा रक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाबाबत स्वतंत्र फेरप्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाशी सातत्याने संपर्कात राहून पाठपुरावा सुरू आहे. शासन स्तरावरूनही या मागण्यांबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रक्कम शासनाकडून प्राप्त होताच संबंधित रक्षकांना अदा केली जाईल, तसेच विद्यापीठ पातळीवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. शासनाकडून २५ ऑगस्टपूर्वी ही रक्कम मिळेल, अशी शक्यता आहे, असे विद्यापीठाने १ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे आंदोलनकर्त्यांना कळवले आहे.
या पार्श्वभूमीवर, विद्यमान प्रलंबित आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासन सदैव सकारात्मक आणि संवेदनशील आहे.
माजी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत विद्यापीठ व शासन सकारात्मक; आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
|