बातम्या
राज्यात नैसर्गिक वाळूचा वापर बंद; सरकारकडून कृत्रिम वाळू वापराला प्राधान्य
By nisha patil - 4/15/2025 4:12:16 PM
Share This News:
राज्यात नैसर्गिक वाळूचा वापर बंद; सरकारकडून कृत्रिम वाळू वापराला प्राधान्य
राज्यात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळूच्या उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि गुन्हेगारीत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नैसर्गिक वाळूचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे धोरण जाहीर केले आहे.
मंत्रिमंडळाच्या 8 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत वाळू-रेती निर्गती धोरण मंजूर करण्यात आले असून, त्यानंतर 9 एप्रिलला सरकारने यासंदर्भातील आदेशही जारी केला आहे.
या नव्या धोरणानुसार, सरकारी बांधकामांमध्ये तातडीने 20 टक्के कृत्रिम वाळूचा वापर सुरू करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांत हा वापर वाढवून नैसर्गिक वाळू पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
नैसर्गिक वाळूच्या पर्याय म्हणून कृत्रिम वाळू 1050 रुपये प्रति ब्रास दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, खासगी बांधकामांमध्येही कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
सर्व जिल्ह्यांतील नद्यांचे सर्वेक्षण केल्यानंतरच खासगी बांधकामांसाठी नैसर्गिक वाळूचा पुरवठा होईल. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना आणि हरकती मागवून अंतिम मसुदा तयार केला होता.
हे धोरण वाळू माफियांवर लगाम घालण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
राज्यात नैसर्गिक वाळूचा वापर बंद; सरकारकडून कृत्रिम वाळू वापराला प्राधान्य
|