बातम्या
निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारुपी शस्त्रांचा वापर करा : शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ
By nisha patil - 12/12/2025 3:52:32 PM
Share This News:
निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारुपी शस्त्रांचा वापर करा : शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ
"मिशन कोल्हापूर महानगरपालिका" अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर दि.१२ : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येत आहेत. याद्वारे गाव आणि प्रभाग पातळीपर्यंत सहाय्यता कक्ष स्थापन करा. यामाध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवा. महायुतीच्या सरकारच्या वतीने विविध लोकोपयोगी योजनांची सुरवात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्यासंकल्पनेतून सुरु झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एस.टी.प्रवासात अर्धे तिकीट, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजना लोकप्रिय झाल्याच यासह आजही अखंडीतपणे सुरु आहेत. शासन आपल्या दारी यातून योजनांची अंमलबजावणी महायुती सरकारने दारोदारी जावून करून घेतली आहे. याच योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा, यासाठी निशुल्क असे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष भागाभागात स्थापन करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ही योजनारुपी शस्त्रे शिवसेनेच्या सर्वच इच्छुकांना, पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली असून, निवडणुकीच्या लढाईपूर्वीच या शस्त्रांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवा, असे आवाहन शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार "मिशन कोल्हापूर महानगरपालिका" अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव होत्या.
यावेळी बोलताना समन्वयक वैभव वाघ यांनी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पश्च्यात रणरागिणी छत्रपती ताराराणी महाराजांच्या युद्धनीतीने औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले. लाखोंच्या संख्येने आलेल्या मुघल सैन्याला युद्धनीती, नियमित सराव, प्रशिक्षणाच्या जोरावर महाराणी ताराराणी यांनी मात दिली. महाराणी ताराराणीच्या या कोल्हापूर नगरीत भगवा डौलाने फडकणार यात तिळमात्र शंका नाही. याकरिता मराठा सैन्याप्रमाणेच शिवसैनिकांनी निवडणुकीच्या लढाईपूर्वी सज्ज असणे गरजेचे आहे. विरोधकांकडून देण्यात येणाऱ्या प्रलोभनांवर मात करण्यासाठी महायुतीने दिलेली योजनेची आयुष्यभराची ठेव पुरेशी आहे. त्यामुळे नागरी सहाय्यता केंद्राची स्थापना करून या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा, अशा सूचना दिल्या.
कोल्हापुरात भगवा फडकणार आमदार राजेश क्षीरसागर यांचा कॉन्फीडन्स : वाघ
शहराचे लोकप्रिय आमदार राजेश क्षीरसागर हे अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आहेत. त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क झाला असता त्यांनी कोल्हापुरात भगवा फडकविणारच असा कॉन्फीडन्स व्यक्त केला. शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार तगडे आहेत. शिवसैनिकांची लढण्याची तयारी, शासनाची योजनांची शिदोरी आणि उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क याचमुळे कोल्हापूरच्या नेत्यांनाही कॉन्फीडन्स आहे. माझ्याकडे राज्यातील ६ जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी आहे, परंतु, हा कॉन्फीडन्स फक्त कोल्हापूरच्या आमदारांनीच दाखविला असल्याचेही, समन्वयक वैभव वाघ यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी बोलताना शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी, योजनांचा लाभ राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना झाला आहे. यामुळेच मतदारही महायुती सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कसभरही कमी झालेली नाही. त्यामुळे महिलांच प्राधान्याने शिवसेनेच्या पाठीशी आहेत. आगामी काळात पक्ष आदेशांप्रमाणे येणारे सर्व उपक्रम मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहचवूया आणि महानगरपालिकेवर भगवा फडकवूया, असे आवाहन केले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक मयूर कदम यांनी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावणे, मतदारापर्यंत पक्षाचे काम, शासकीय योजना पोहचवून जनसंपर्कातून वातावरण निर्मिती करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीची माहिती दिली. प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केले.
यावेळी महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, उदय भोसले, रणजीत मंडलिक, सुनील खोत, राज भोरी, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंग्रस, अरविंद मेढे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, अजित मोरे, प्रवीण लिमकर, आश्पाक आजरेकर, सनी अतिग्रे, निलेश हंकारे, रविंद्र पाटील, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, पियुष चव्हाण, सौरभ कुलकर्णी, अविनाश कामते, कपिल पोवार आदी उपस्थित होते.
निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारुपी शस्त्रांचा वापर करा : शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ
|