बातम्या
उत्तम कोकितकर यांना दै. पुढारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
By nisha patil - 5/15/2026 9:06:30 PM
Share This News:
**उत्तम कोकितकर यांना दै. पुढारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
नाम. हसन मुश्रीफ यांचे हस्ते पुरस्कार प्रदान*
आजरा(हसन तकीलदार)**समाजाची जडणघडण आणि आदर्श समाजाची रचना करण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. "उत्तम" शिक्षकच एक आदर्श समाजाची निर्मिती करु शकतो. शिक्षण आणि संस्काराची सांगड घालून जो शिक्षक ज्ञानदानाचे काम करतो तो शिक्षक विद्यार्थी आणि सुसंस्कृत समाज घडवू शकतो.
आजरा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात ज्या ठिकाणी शिक्षणाचा म्हणावा तसा गंध नव्हता अशा डोंगराळ भागात,ज्याठिकाणी अतिपाऊस पडतो,ज्या भागाला प्रतीचेरापुंजी म्हणून संबोधले जाते अशा किटवडे धनगरवाड्यात अतिशय प्रामाणिकपणे ज्यांनी शिक्षकी पेशाला न्याय दिला ते शिक्षक उत्तम कोकितकर सर यांना दै. पुढारी आणि प्रयोग सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
उत्तम कोकितकर यांनी आपल्या 33 वर्षाच्या सेवा कालखंडात अनेक शाळा आदर्शवत केल्या आहेत. त्यातील विद्या मंदिर किटवडे धनगरवाड्यातील शाळेसाठी दिलेले योगदान अतिशय मोलाचे, आदर्शवत आणि अतुलनीय आहे. अतिशय दुर्गम भागात, डोंगर कपारीत वसलेल्या तसेच पावसाळ्यात पावसाचे प्रमाण इतके आहे की या भागाला प्रतीचेरापुंजी म्हणून संबोधले जाते. अशा दुर्गम धनगरवाड्यात कोकितकर सरांनी आपल्या कौशल्याने आणि चिकाटीने मुले आणि पालक यांच्यामध्ये शिक्षण व शाळेबद्दल आकर्षण निर्माण केले. झाडाखालची शाळा म्हणजेच शाळेसाठी इमारत नसतानासुद्धा त्यांनी झाडाखाली शाळा भरवली आणि विद्यार्थी घडवले. झाडाखाली सुरु झालेली शाळा ते ई -लर्निंग शाळेपर्यंत पोहचवण्याचा प्रवास चकित करणारा आहे. पाहिली ते आठवी पर्यंतची शाळा एकखांबी तंबुप्रमाणे त्यांनी अगदी कौशल्याने सांभाळली.शाळेमध्ये राबवलेल्या अनेक उपक्रमांची नोंद घेऊन अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थानी त्यांना गौरवले आहे. धनगरवाडा- किटवडे सारख्या अतिदुर्गम शाळेला मिळवून दिलेला सन्मान आणि या शाळेसाठी त्यांनी दिलेले योगदान तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. कार्याची दखल घेत दै. पुढारी आदर्श शिक्षक पुरस्काराने रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांचे हस्ते दिलेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा केलेला यथोचित सत्कार आहे. या अगोदरही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य, केदारी रेडेकर, गुरुदेव, डॉ. जे. पी. नाईक, अविष्कार फाउंडेशन, राजर्षी शाहू, साई समर्थ, श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा, ऋग्वेद, कै राजाराम बापू देसाई, सुयश, कै. बाबुराव परळकर, धर्मवीर, गुरुवर्य अनंतराव आजगावकर, कै. माणिकराव पाटील, महात्मा जोतिबा फुले आणि आता दै. पुढारी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
वेळप्रसंगी स्वतः पदरमोड करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी खर्च करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे तसेच शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. हसत खेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब त्यांनी केला.त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद, आदर्शवत आणि अनुकरणीय आहे.
उत्तम कोकितकर यांना दै. पुढारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
|