बातम्या
वि.स. खांडेकर,शिवाजी सावंतांसारखे लेखक आताच्या काळात निर्माण व्हावेत - डॉ.सुनिलकुमार लवटे
By nisha patil - 3/10/2025 3:30:42 PM
Share This News:
वि.स. खांडेकर,शिवाजी सावंतांसारखे लेखक आताच्या काळात निर्माण व्हावेत - डॉ.सुनिलकुमार लवटे
कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. मराठी भाषेचे अभिजातपण टिकवून ठेवण्यासाठी वि.स. खांडेकर, शिवाजी सावंतांसारखे लेखक आताच्या काळातही निर्माण व्हावेत, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषा अधिक समृद्ध आणि विकसित होण्यासाठी सर्व स्तरांतून नियोजनबद्ध आराखडा निर्माण व्हावा. कोल्हापूरातील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मोठी असून त्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत तसेच अभिजातपणा पुढे नेण्यासाठी अग्रभागी असावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा आजच्या काळात युवकांनी मोबाईलच्या अतिवापरातून इंग्रजी-हिंदी युक्त करून टाकली आहे.
यासाठी मराठी वाचन, लिखाण, मराठी ऐकणे, मराठी बोलणे, मराठीत विचार आणि विश्लेषण करण्यास सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अगदी मराठी भाषेत आपल्याला स्वप्न पडले पाहिजेत. कारण आपले जागृत मन ज्या भाषेत काम करीत असते, तीच भाषा आपल्यात विकास पावते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गुंडोपंत पाटील यांनी केले. उद्घाटन रोपाला पाणी देऊन झाले तर मान्यवरांचे स्वागत डॉ.व्ही.एम.पाटील यांनी केले. आभार डॉ.एकनाथ पाटील यांनी मानले. सुरुवातीला कविवर्य सुरेश भट यांच्या मराठी अभिमान गीताचे गायन विद्यार्थ्यांमार्फत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम.ए. नायकवडी आणि प्रा. डॉ. उमा गायकवाड यांनी केले. जिल्हा मराठी भाषा समिती मार्फत दि. ०३ ते ०९ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी भाषा विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वि.स. खांडेकर,शिवाजी सावंतांसारखे लेखक आताच्या काळात निर्माण व्हावेत - डॉ.सुनिलकुमार लवटे
|