बातम्या
असाही एक प्रेरणादायी आणि आदर्शवत वाढदिवस सोहळा
By nisha patil - 4/28/2026 4:32:52 PM
Share This News:
**असाही एक प्रेरणादायी आणि आदर्शवत वाढदिवस सोहळा*
आजरा (हसन तकीलदार )*-: मूळ गाव हुंबरवाडी (ता. चंदगड) येथील बाळू उर्फ तुकाराम पट्टेकर यांनी आपली कन्या कुमारी गिरीजा हिचा मस्कत (ओमान )येथे सातवा वाढदिवस अत्यंत साधेपणाने, अध्यात्मिक व संस्कारमय वातावरणात साजरा करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
या सोहळ्यात बालगोपालांसह उपस्थितांनी एकत्र येत सात वेळा हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले तसेच रामरक्षा स्तोत्राचेही भक्तिभावाने गायन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. विशेष म्हणजे, अशा सामूहिक धार्मिक उपक्रमांतून लहान मुलांमध्ये संस्कार, भक्तीभाव व एकाग्रता वृद्धिंगत होते, तर तरुण पिढीला आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव होऊन संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळते.
सोहळ्यात कोणताही दिखाऊ खर्च न करता सर्वांना प्रेमपूर्वक प्रसादरूप भोजन देण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधत तुकाराम पट्टेकर यांनी अनावश्यक खर्च टाळून चंदगड येथील ‘रयत आरोग्य सेवा केंद्र’ (संचालक : श्री संदीप गावडे, PRO KLE) या समाजोपयोगी संस्थेला आर्थिक मदत केली. गरजू रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकीय साहित्य व घरपोच सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेस दिलेली मदत ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती ठरली.
या कुटुंबाला वडिलोपार्जित संस्कारांची समृद्ध परंपरा लाभली असून ह. भ. प. श्री मारुती भीमाण्णा पट्टेकर यांच्या मार्गदर्शनातून कुटुंबात अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेची मूल्ये दृढ झाली आहेत.
परदेशात वास्तव्यास असूनही पट्टेकर वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार सातत्याने करत आहेत. प्रत्येक एकादशी तसेच विविध सणांच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी नियमित भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मराठी संस्कृती व वारकरी परंपरा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
कुटुंबीय क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी क्रीडाप्रेमही जपले आहे. चिरंजीव गगन पट्टेकर याने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कुटुंबाचे नाव उंचावले.
पट्टेकर हे घाटकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जयसिंग गोपाळ पाटील यांचे मेहुणे असून त्यांच्या बालपणीचा काळ घाटकरवाडी व परिसरात व्यतीत झाला आहे. तेथूनच त्यांना संगीत क्षेत्राची आवड निर्माण झाली.
एकूणच, साधेपणा, अध्यात्म, समाजसेवा आणि क्रीडाप्रेम यांचा सुंदर संगम साधत साजरा केलेला हा वाढदिवस नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे.
असाही एक प्रेरणादायी आणि आदर्शवत वाढदिवस सोहळा
|