बातम्या
वारे वसाहतीत तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, संशयित मित्र पोलिसांत हजर
By nisha patil - 9/7/2026 7:57:10 PM
Share This News:
वारे वसाहतीत तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, संशयित मित्र पोलिसांत हजर
कोल्हापूर, प्रतिनिधी :कोल्हापूर शहरातील वारे वसाहत समोरील नंदिवली दर्गा परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आशिष अशोक जाधव (वय ३०) या तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणातील संशयित तरुण स्वतःहून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारे वसाहत परिसरातील रहिवासी असलेल्या आशिष जाधव याच्यावर यापूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. गेल्या काही वर्षांपासून तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.
गुरुवारी सायंकाळी आशिष जाधव दुचाकीवरून नंदिवली दर्गा परिसरातून जात असताना त्याचा एका मित्रासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन संशयिताने जाधवच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार मोहन लागारे घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधवला अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित तरुण सायंकाळी सुमारे सात वाजता स्वतःहून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणाचा अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वारे वसाहतीत तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, संशयित मित्र पोलिसांत हजर
|