बातम्या
चेष्टा-मस्करीचे पर्यवसान रक्तरंजित!
By nisha patil - 9/7/2026 4:23:14 PM
Share This News:
**चेष्टा-मस्करीचे पर्यवसान रक्तरंजित!
दुचाकी अंगावर घालण्याच्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड; तरुण गंभीर, उच्चशिक्षित मित्र अटकेत**
कोल्हापूर, प्रतिनिधी : क्षणभराची चेष्टा-मस्करी आणि त्यातून पेटलेला संताप एका तरुणाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. दुचाकी अंगावर घालण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. संतापाच्या भरात एका मित्राने रस्त्यातील दगड उचलून दुसऱ्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वारे वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अतुल पांडुरंग पांढरे (वय ३५, रा. वारे वसाहत) याला अटक केली असून आशिष अशोक जाधव (वय २७, रा. वारे वसाहत) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल पांढरे हा उच्चशिक्षित असून पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. चार दिवसांच्या सुट्टीसाठी तो कोल्हापुरात आला होता. गुरुवारी सायंकाळी तो मित्र आशिष जाधव याच्यासोबत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. दोघेही दुचाकीवरून वारे वसाहत परिसरात आले असता, दुचाकी अंगावर घालण्याच्या चेष्टा-मस्करीवरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. याचवेळी संतापलेल्या अतुलने रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून आशिषच्या डोक्यावर प्रहार केला. जोरदार वारामुळे आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर अतुल घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना कळविले. पोलिस हवालदार मोहन लगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आशिष याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान,जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे हलवत संशयित अतुल पांढ़रे याला ताब्यात घेत अटक केली.या घटनेमुळे वारे वसाहत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
किरकोळ चेष्टा-मस्करीतून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे .पोलिसांकडुन पुढ़ील तपास सुरु आहे.
चेष्टा-मस्करीचे पर्यवसान रक्तरंजित!
|