बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलात महाहादगा निमित्त माता पालकांचा स्नेहमेळावा संपन्न
By nisha patil - 8/10/2025 11:35:57 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव शिक्षण समूहात महाहादगानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींच्या माता पालकांना हळदी कुंकू व व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वातीताई कोरी उपस्थित होत्या. त्यांना नुकताच हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षि शाहू आध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर येथील कार्यक्रमात प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या संचालिका सौ. अलकाताई शिंपी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील आपल्या मनोगतात सर्व माता पालकांना प्रा.सौ. स्वातीताई कोरी यांनी आपल्या या सत्कार बद्दल आभार मानले व मनोगतातून सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा जपत प्रत्येक विद्यार्थिनींने स्वकर्तृत्वावर स्वतःचे नाव निर्माण करावे. मन लावून शिक्षण घ्यावे आणि पुढे माता, माय भूमी, मातृशाळा आणि देशाची सेवा आपल्याला करणे हे आपले कर्तव्य मानावे. तसेच पालकमातानीसुद्धा आपल्या मुलींना स्वयंपाक शिकवत आणि आपल्या संस्कृतीचीही ओळख करून द्यावी. कारण शिक्षणाबरोबर संस्कृती जपणे हे देखील स्त्रीचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या संचालिका सौ.अलकाताई जयवंतराव शिंपी यांनी अध्यक्षस्थान भूषविले त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, या सावित्रीच्या लेकीनी भरपूर शिकावे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर जावे. शिक्षण घेण्यासाठी या प्रशालेतील ज्या विद्यार्थिनींना अडचण येईल मदतीची गरज लागेल त्यांच्या मदतीला मी नेहमीच पुढे येईन असे आश्वासित केले . आजच्या या कार्यक्रमासाठी माता पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने त्यांना आनंद झाल्याचे सांगितले.
प्रशालेतील सर्व शिक्षिका,विद्यार्थिनी व माता पालक यानी हस्त नक्षत्रातील हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून गोल रिंगण करून हादग्याची गाणी म्हटली हळदी कुंकू चा कार्यक्रम झाल्यानंतर माता पालकांना वान देण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये माजी नगरसेविका सौ.सुमैय्या खेडेकर व सौ. माया विलास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संचालिका सौ. प्रियांका अभिषेक शिंपी, सौ.आशा सचिन शिंपी, सौ.सीमा पोवार (माजी नगरसेविका), सौ.शोभा पटेकर, सौ. नंदाताई घोरपडे, सौ.पुष्पांजली जाधव, सौ.मेदिनी पाटील, सौ. सुगंधा जाधव, सौ.शालन घोरपडे, सौ.माया पाटील, सौ.कल्पना जाधव, महाडिक मॅडम, प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही.ए. वडवळेकर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय ..सौ.ए.डी. पाटील, हादगा सणाची माहिती सौ. एस.डी.इलगे यांनी दिली. आभार श्रीम.आर.एन. पाटील यांनी मानले.
व्यंकटराव शिक्षण संकुलात महाहादगा निमित्त माता पालकांचा स्नेहमेळावा संपन्न
|