बातम्या
व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न
By nisha patil - 6/5/2026 3:51:06 PM
Share This News:
व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न
आजरा(हसन तकीलदार) - येथील आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महादेव मीनाजी नागुर्डेकर यांचा शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले असून, प्रशालेच्या वतीने त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. त्यांच्या शुभहस्ते नागुर्डेकर यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. प्रारंभी नागुर्डेकर बंधूंच्या वतीने संस्थेच्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
आदर्श प्रशासक आणि उत्तम शिक्षक
संस्थेचे सचिव श्री. अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगतात प्राचार्य नागुर्डेकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, "एक सुसंस्कारित, शिक्षणाची ओढ असणारी आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारी व्यक्ती आम्हाला प्राचार्य म्हणून लाभली. इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि शिक्षक-पालक-संस्था यांच्यातील आदर्श दुवा म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या नियोजनामुळेच कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रशालेला मोठे यश मिळाले.
सत्काराला उत्तर देताना नागुर्डेकर भावुक झाले. ते म्हणाले, "५ सप्टेंबर १९९४ रोजी मी याच प्रशालेत रुजू झालो. २९ वर्षे सिरसंगी येथील आदर्श हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे ज्ञानदान केले. शेवटच्या वर्षी संस्थेच्या मुख्य शाखेत प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थी, पालक आणि संस्था यांच्या समन्वयातून काम करता आले, याचे मला मनस्वी समाधान आहे.
संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी नागुर्डेकर सरांच्या प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि नम्रता या गुणांचे कौतुक करत, त्यांच्या पुढील आयुष्यास सुख-समाधान आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले, तर आभार सौ. व्ही. ए. वडवळेकर यांनी मानले. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक डी. आर. पाटील, एम. एम. देसाई आणि नागुर्डेकर सरांच्या ज्येष्ठ बंधूंनीही आपले विचार व्यक्त केले. या समारंभाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न
|