खेळ
औषधांच्या रिअॅक्शनमुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू कोमात; प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष
By nisha patil - 12/31/2025 11:50:47 AM
Share This News:
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांसोबत क्रिकेट खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी नामांकित क्रिकेटपटू डेमियन मार्टिन सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, औषधांच्या दुष्परिणामांमुळे तो कोमामध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
डेमियन मार्टिनला ताप आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिलेल्या औषधांवर गंभीर प्रतिक्रिया उमटल्याने त्याची प्रकृती अचानक खालावली आणि तो कोमात गेला. मात्र, डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पुढील काही दिवसांत तो कोमामधून बाहेर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या डेमियन मार्टिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 54 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द सिडनी मॉर्निंग हेराल्डने माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्ट यांच्या हवाल्याने मार्टिन रुग्णालयात असल्याची पुष्टी केली आहे.
गिलख्रिस्ट यांनी सांगितले की, मार्टिनला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात असून त्याची प्रकृती स्थिर होण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत. या घटनेनंतर जगभरातील क्रिकेट चाहते चिंतेत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मार्टिनसोबत खेळलेले अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देखील त्याच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करत आहेत.
औषधांच्या रिअॅक्शनमुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू कोमात; प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष
|