बातम्या
ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर काळाची गरज -विक्रमसिंह देसाई
By nisha patil - 1/21/2026 11:14:52 PM
Share This News:
ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर काळाची गरज -विक्रमसिंह देसाई
आजरा(हसन तकीलदार)*:-अपुरे मनुष्यबळ, ऊसतोडटोळ्यांची कमतरता आणि वाहनमालकांना ऊसतोडटोळ्याकडून होणारी फसवणूक यामुळे साखरकारखानदारीमध्ये अनंत अडचणी येत आहेत. त्यात यावर्षी वाढलेले पर्जन्यमान, ऊसाची खुंटलेली वाढ, रानटी जनावरे आणि हत्तीमुळे झालेले ऊसाचे नुकसान यामुळे ऊसटोळ्या ऊस तोडताना शेतकऱ्यांना त्रास देताना दिसत आहेत. हजारांच्या घरात खुशाली गाठली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
तर वाहतूकदारांना ऊसतोडटोळ्या फसवत असल्यामुळे वाहनमालकांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. टोळ्यांनी फसवल्यामुळे काही ट्रक मालकांना आपली ट्रकवाहने विकून कारखान्याची कर्जे परत फेड करावी लागली. ट्रक मालक सुद्धा देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही असे मत आजरा साखर कारखान्याचे मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आजऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचे अति प्रमाण असल्यामुळे ऊसाची उंची वाढत नाही. किटवडे सारख्या गावाला तर प्रती चेरापुंजी असे संबोधले जाते. त्यामुळे ऊसतोडटोळ्या ऊस तोडणीसाठी धजावत नाहीत. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मांजरी बु. पुणे यांचे नांगरतास आंबोली येथील ऊस प्रजनन केंद्रातील ऊस तोडीसाठी आजरा साखर कारखान्याने ऊसतोड यंत्राचा प्रायोगिग वापर केला. यावेळी मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई म्हणाले की, सद्याच्या काळात मजुरांचा तुटवडा भासत आहे. तोडणी यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाकडे वळणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊसबागायतशेतकऱ्यांनी चारफुटी सरी ठेऊन ऊसाची लागवड करावी असे आवाहन केले.
तर ऊसतोडणी यंत्रमालक आनंदराव अप्पासाहेब चव्हाण रा. नुल,ता. गडहिंग्लज यांनी आपले मत मांडताना म्हटले की, मजुरांचा तुटवडा असल्यामुळे तोडणीयंत्राला आता मागणी वाढत आहे. साधारणपणे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची गुंतवणूक होते. पुणे येथील शक्तिमान व्होल्व्हो कंपनीला वार्षिक साठ हजार देखभाल दुरुस्तीला व हंगामात एक लाख रुपये भरून विमा काढावा लागतो. एका हंगामात किमान 12 ते 13 हजार मे. टन ऊसतोडणी करणे गरजेचे आहे. तरच साधारणपणे 6 ते 7 वर्षात कर्जाची परतफेड करता येते. मशीन ऑपरेटर व ड्रायव्हर चांगले मिळाले तर हे उद्दिष्ट साध्य करता येते. त्याचप्रमाणे ऊसाच्या प्लॉटमध्ये दगड गोटे नसावेत, प्लॉट मोठा व समतल असावा, चारफुटी सरी असावी तर ऊसतोडणीला सोयस्कर जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, कार्यकारी संचालक एस. के. सावंत, असी. अकाउंटंट रमेश वांगणेकर कार्यलयीन अधीक्षक अनिल देसाई यांनी सदर प्लॉटला भेट देऊन पाहणी केली तर ऊसपुरवठा अधिकारी अजित उर्फ राजू देसाई, शेती विभागचे मुख्यलिपिक संदीप कांबळे व व्ही. एस.आय.चे टेक्निकल ऑफिसर डॉ. गोविंद साबळे यांनी नियोजन केले.
ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर काळाची गरज -विक्रमसिंह देसाई
|