ताज्या बातम्या
कुंभोजमध्ये गाव बंद : बाजारपेठेच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला ग्रामस्थांचा ठाम पाठिंबा
By nisha patil - 9/18/2025 12:44:07 PM
Share This News:
कुंभोज (ता. हातकणंगले किशोर जासूद)
कुंभोज बाजारपेठेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस झाला आहे. त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण गावाने एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. परिणामी कुंभोजमध्ये गाव बंद पाळण्यात आला.
देवमोरे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने आरोग्य विभागाने त्यांना पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, "बाजारपेठेचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही," असा ठाम निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे.
दरम्यान, उपोषण स्थळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी भेट देऊन देवमोरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी देवमोरे यांना “उपोषण सोडले नाही तरी निदान पाणी पिण्यास सुरूवात करावी, प्रशासन तुमच्या मागणीवर काम करण्यास कटिबद्ध आहे,” असे आश्वासन दिले. प्रांताधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करून देवमोरे यांनी फक्त पाणी पिण्यास सुरुवात करण्याचे मान्य केले; मात्र उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या वेळी तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय चौगुले उपस्थित होते. संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता उपोषण स्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गावातील सर्व दुकाने, बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. महिला मंडळे, युवक संघटना तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
कुंभोजमध्ये गाव बंद : बाजारपेठेच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला ग्रामस्थांचा ठाम पाठिंबा
|