ताज्या बातम्या
चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष शिरढोण ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण
By nisha patil - 12/25/2025 6:52:21 PM
Share This News:
शिरढोण प्रतिनिधी/(संजय गायकवाड) :- शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची तक्रार झाल्याने बुधवारपासून चौकशी समिती येथील ग्रामपंचायतीमध्ये दप्तर तपासणी सुरु केले आहेत. मात्र चौकशीत अपहाराचे अनेक सुरस प्रकार पाहून चौकशी समितीही चकित होत आहे. त्यामुळे चौकशीत कोणत्या कामात कशा प्रकारे, किती रकमेचा अपहार झाला आहे याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.
शिरढोण ग्रामपंचायतीत गेल्या साडेचार वर्षात सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. या विषयावरुन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ग्रामसभेत राडा झाला होता. गैरव्यवहाराबाबत सरपंचासह सदस्यही मौन बाळगल्याने गावातील प्रमुख लोकांनी २०२२ पासून ग्रामपंचायत कारभार, विविध कामांवर केलेल्या खर्चाची तपासणी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केल्याने तपासणी समितीने दप्तर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये समाज मंदिर दुरुस्ती, डस्टबीन खरेदी, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा खरेदीवर अव्वाच्या सव्वा खर्च करण्यात आला आहे. या सर्व खर्चाचा पंचनामा होणार असल्याने ग्रामसेवकांसह सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
जून २०२४ मध्ये रुजू झालेले ग्रामसेवक विनायक शेवरे जुलै २०२५ मध्ये बदली झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रोसिडींग अपूर्ण असल्याने आॅक्टोबर महीन्यात प्रोसिडींग पुर्ण करण्यासाठी शेवरे यांनी घरी नेले आहेत. मात्र अद्याप प्रोसिडींग जमा न केल्याने सरपंच सागर भंडारे यांनी शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सावळा गोंधळ पाहून अधिकाऱ्यांसह चौकशी समितीही डोक्याला हात लावले आहेत.
चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष शिरढोण ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण
|