विशेष बातम्या
देवस्थान समितीत पहिल्यांदाच विशाखा समिती स्थापन; हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश
By nisha patil - 11/20/2025 6:30:38 PM
Share This News:
देवस्थान समितीत पहिल्यांदाच विशाखा समिती स्थापन; हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पहिल्यांदाच विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर, देवस्थान समिती कार्यालय आणि जोतिबा देवस्थान या तीन ठिकाणी ही समिती आता कार्यरत राहणार आहे. या महत्वाच्या निर्णयासाठी हिंदू एकता आंदोलनाने सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.
अंबाबाई मंदिराची पाहणी करताना काही महिलांनी तक्रारी नोंदवण्यासाठी योग्य समिती नसल्याची माहिती दिली. त्यानंतर हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने विशाखा समिती स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तत्काळ कार्यवाही केली.
१९९७ मध्ये सर्व सरकारी व खासगी संस्थांमध्ये महिलांच्या लैंगिक छळ तक्रारींसाठी विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र देवस्थान समितीत आतापर्यंत ही समिती नव्हती. अखेर दीर्घकाळापासून असलेली ही पोकळी भरून काढत समितीची स्थापना पूर्ण झाली आहे.
देवस्थान समितीच्या कार्यालयात लेखाधिकारी अस्मिता मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात निवृत्त प्राचार्या डॉ. मंगला पाटील, क्रीडा शिक्षिका उमा भेंडेगिरी आदींचा समावेश आहे, तर महादेव दिंडे समितीचे व्यवस्थापक म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
देवस्थान समितीत पहिल्यांदाच विशाखा समिती स्थापन; हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश
|