विशेष बातम्या
गोकुळश्री’ स्पर्धेत चमकले विश्वास कदम व युवराज चव्हाण..
By nisha patil - 9/12/2025 5:51:35 PM
Share This News:
गोकुळश्री’ स्पर्धेत चमकले विश्वास कदम व युवराज चव्हाण..
एकाच दिवशी ३५ लिटर दूध! रांगोळीच्या एच.एफ. गायीने ठरवला नवा विक्रम
जाफराबादी म्हशीचा दमदार विक्रम; केर्ली गावाचा गौरव वाढवला :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आयोजित ‘गोकुळश्री’ स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. २०२५-२६ मधील या वार्षिक स्पर्धेत एकूण ११४ गायी व म्हशींनी सहभाग नोंदवला होता. दूध उत्पादन वाढीसाठी आणि उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळकडून गेली ३२ वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाते.
यंदाच्या स्पर्धेत म्हैस गटात केर्ली (ता. करवीर) येथील विश्वास यशवंत कदम यांच्या जाफराबादी म्हशीने एका दिवसात २१ लिटर ९५५ मि.ली. दूध देत प्रथम क्रमांक पटकावला.
तर गाय गटात रांगोळी (ता. हातकणंगले) येथील युवराज विठ्ठल चव्हाण यांच्या एच.एफ. गायीने ३५ लिटर ८७० मि.ली. दूध देत प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील पारदर्शकता व निकोप व्यवस्थापनासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागासोबत स्थानिक प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहकार्य केले. या स्पर्धेमुळे दूध उत्पादनाबरोबरच गुणवत्तेमध्येही वाढ होत असल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
तसेच, पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदा विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार ३५ हजार, ३० हजार व २५ हजार (म्हैस गट) तसेच २५ हजार, २० हजार व १५ हजार (गाय गट) अशी बक्षिसे देण्यात आली.
गोकुळश्री’ स्पर्धेत चमकले विश्वास कदम व युवराज चव्हाण..
|